सिक्कीममध्ये एक हजार पर्यटक अडकले   

गंगटोक : उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. लाचेन-चूंगथांग मार्ग आणि लाचून-चूंगथांग मार्गावरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली असून, एक हजारांहून अधिक पर्यटक तिथे अडकले आहेत. हे पर्यटक चूंगथांगमधील गुरुद्वारात थांबले आहेत. 
 
सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  पावसामुळे लाचेन-चुंगथांग रस्त्यावरील मुन्शिथांग आणि लाचुंग-चुंगथांग रस्त्यावरील लेमा/बॉब येथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्त्यांवर ढिगारे साचले आहेत. जोरदार पावसामुळे हा ढिगाराही हटवता येत नाही. पावसाची संततधार सुरूच असल्याने बचावकार्य करण्यास अडथळा येत आहे. 
 
पर्यटकांना घेऊन जाणारी जवळपास २०० वाहने गुरुवारी चूंगथांगमध्ये अडकली होती. चूंगथांग गंगटोकपासून जवळपास १०० किमी अंतरावर आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व पर्यटन संस्थांना पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना उत्तर सिक्कीममध्ये न आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
सिक्कीम प्रशासनाने या भागात येणार्‍या पर्यटकांना दिलेले सर्व परवाने रद्द केले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, लाचुंग आणि लाचेनकडे जाणारे रस्ते आपत्तीमुळे खराब झाले आहेत, त्यामुळे एक हजार पर्यटक अडकून पडले आहेत. लाचुंग आणि लाचेन ही थंड हवेची ठिकाणे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत.
 

Related Articles